मंडाले : म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा १७०० वर पोहोचला आहे, तर शेजारील देश थायलंडमध्येही १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपामुळे इमारती कोसळल्या, पूल कोसळले आणि रस्त्यांचे नुकसान झाले.
जखमींची संख्या ३,४०८ वर पोहोचली आहे, तर १३९ लोक बेपत्ता आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू असताना मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा इशारा अधिका-यांनी दिला आहे. १.७ मिलियन लोकसंख्या असलेल्या मांडाले शहराचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. ६.७ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढिगा-यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी स्थानिक लोक स्वत: मदत कार्यात गुंतले आहेत.
स्थानिक लोक ढिगारा हटवून शोधताहेत मृतदेह
स्थानिक चहाच्या दुकानाचे मालक विन ल्विन यांनी सांगितलं की, त्यांच्या रेस्टॉरंटच्या ढिगा-यात ७ जणांचा मृत्यू झाला. एएफपीनुसार, ते विटा काढून मृतदेह काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना कोणीही जिवंत सापडेल अशी अपेक्षा नाही.
भारताने पाठवली मदत
भारताने म्यानमारला आवश्यक साहित्य, वैद्यकीय उपकरणे आणि बचाव पथकं पाठवली आहेत. मदत साहित्य घेऊन पाच लष्करी विमाने पोहोचली आहेत, ज्यात ८० सदस्यांची एनडीआरएफ टीम आणि एक लष्करी फील्ड हॉस्पिटलचा समावेश आहे. आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री यांच्यामार्फत मदत पाठवली जात आहे.
संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता
संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे की, म्यानमारमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत. आधीच युद्धाचा सामना करणा-या या देशात ३.५ मिलियन लोक विस्थापित झाले आहेत आणि उपासमारीचा धोका वाढला आहे. मदत संस्थांनी सांगितले की, म्यानमार या मोठ्या प्रमाणात होणा-या आपत्तीसाठी तयार नव्हते.
थायलंडमध्येही विध्वंस, १७ जणांचा मृत्यू
भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली, त्यात किमान १७ जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले. ८३ लोक अजूनही बेपत्ता आहेत, जे ढिगा-याखाली गाडले गेल्याची भीती आहे.