25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रखा. भावना गवळी यांच्या प्रतिष्ठानचे खाते गोठवले

खा. भावना गवळी यांच्या प्रतिष्ठानचे खाते गोठवले

अकोला : प्रतिनिधी
कर चुकवल्या प्रकरणी यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे बँक खाते आयकर विभागाच्या वतीने गोठवण्यात आले. ८ कोटी २६ लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली. कलम २२६ (३) अंतर्गत आयकर विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी आयकर विभागाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

मागच्या आठवड्यात आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर खासदार गवळींनी दोन दिवसांपूर्वी अकोला आयकर कार्यालयात आपल्या सीएच्या माध्यमातून कागदपत्रे सादर केली होती. मात्र, आयकर विभागाचे समाधान न झाल्याने खाते सील करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेने २०१३ ते २०१६ मध्ये आयकर चुकवल्याचा आरोप असून, त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली.

भावना गवळी सध्या सत्ताधारी शिंदे गटात आहेत. यापूर्वी त्या उद्धव ठाकरे गटात होत्या. याच प्रकरणात त्यांना आधी नोटीस आल्या होत्या. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील १९ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप असून, आयकर विभागाला याच १९ कोटींचा हिशोब हवा आहे तर उद्धव ठाकरे गटात असतानादेखील याच प्रकरणात खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली होती.

आरोपीचे खाते गोठवले
आयकर विभागाने आरोपीचे खाते गोठवले आहे. माझे खाते गोठवलेले नाही. यातून माझी प्रतिमा खराब करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप खा. भावना गवळी यांनी केला. यावेळी त्यांनी मेरी झाशी नहीं दुंगी, असे म्हणत यवतमाळमधून त्या लढण्यावर ठाम असल्याचे संकेत दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR