वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प दुस-यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. एका बाजूला यासाठी प्रतिष्ठित अतिथींची चर्चा रंगत असताना दुस-या बाजूला डिनर पॉलिटिक्सचा मुद्दा चर्चेत आला आहे.
काय आहे ट्रम्प ‘डिनर पॉलिटिक्स’? शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वन्स यांच्याकडून खासगी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मांदियाळी पाहायला मिळतीये. पण तुम्हाला पटणार नाही, हा डिनर या मंडळींना फ्रीमध्ये नाही. यासाठी त्यांना बक्कळ पैसा खर्च करावा लागला आहे. ही संकल्पना फंडरेजिंग डिनर नावानेही ओळखली जाते. ज्यात डिनर मेजवानीचा अस्वाद घेण्यासाठी येणारे पाहुणे निधी संकलनाच्या रुपात मदतीच्या स्वरुपात पैसा देतात. निधी गोळा करण्यासाठी आयोजित डिनर कार्यक्रमात ५ वेगवेगळ्या पॅकेजचा समावेश आहे.
याचा अर्थ ट्रम्प यांच्या शपथविधीआधी डिनर कार्यक्रमातील एन्ट्रीसाठी पाच प्रकारची तिकीटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पहिल्या स्तरावरील तिकीटाची किंमत ही जवळपास १ मिलियन अमेरिकी डॉलर अर्था जवळपास ९ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय अन्य तिकीटांची किंमत ५००,००० डॉलर, २५०,००० डॉलर, १००,००० डॉलर आणि ५०,०० डॉलर अशी आहे. मोठ्या देणगीदारांसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष यांना वैयक्तिकरित्या भेटीसाठी दुप्पट रक्कम मोजावी लागेल.
सर्वाधिक किंमत ही १ मिलीयन डॉलर इतकी आहे. या पॅकेजमध्ये देणगीदाराला नव नियुक्त उपराष्ट्राध्यक्ष जेडी वन्स यांच्यासोबत डिनरसाठी दोन तिकीट आणि ट्रम्प यांच्यासोबतच्या ‘कँडललाइट डिनर’साठी ६ तिकीटांचा समावेश आहे. बहुतांश मंडळींनी या पॅकेजला पंसती दिल्याचा उल्लेखही वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
२ हजार कोटी निधी गोळा करण्याचे लक्ष्य
आयोजक समितीच्या अहवालानुसार, डिनर मेजवानीच्या कार्यक्रमातून आतापर्यंत जवळपास १७०० कोटी रुपये इतका निधी जमा झाला आहे. एकूण २ हजार कोटीचे लक्ष्य आहे. अहवालानुसार, २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्षांसोबतच्या डिनर कार्यक्रमाच्या माध्यमातून १०६ मिलियन डॉलर इतका निधी जमा झाला होता. ज्यावेळी जो बायडेन यांनी शपथ घेतली होती त्याआधी आयोजित करण्यात आलेल्या डिनर कार्यक्रमात १३५ मिलियन डॉलर इतकी रक्कम जमा झाली होती. यावेळी ट्रम्प यांना भेटण्यासाठी लोक उत्सुक आहेत. खासकरुन प्रतिष्ठित उद्योगपतींनी ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात अधिक रस आहे.