न्यूयॉर्क : अमेरिकेत आलेली आर्थिक सुस्ती जगभरातील टेक सेक्टरची चिंता वाढवत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसान यावर्षी जगभरात १ लाख ३० हजार कर्मचा-यांच्या नोक-या कर्मचारी कपातीमुळे गेल्या आहेत. सिस्को, इंटेल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचा-यांना नारळ दिला आहे. चिंतेची बाब म्हणजे येणा-या दिवसांमध्येही ही कामगार कपात थांबण्याची चिन्हे नाही आहेत.
त्याचे कारण म्हणजे अमेरिकेमध्ये मंदीचे सावट अधिकाधिक गडद होऊ लागले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग गोळा होऊ लागले आहेत. त्यातही भारतामध्ये आयटी क्षेत्रासह इतर क्षेत्रांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकेमधील अनेक प्रमुख इकॉनॉमिक इंडिकेटर्समध्ये कमकुवतपणाचे संकेत दिसत आहेत. बेरोजगारीचे प्रमाणही जानेवारीतील निचांकावरून कमालीचे वाढले आहे. जुलै महिन्यात बेरोजगारीचा दर ३ वर्षांमधील सर्वोच्च अशा ४.३ पर्यंत पोहोचला आहे. याशिवाय उत्पादन क्षेत्रातील पीएमआय मागच्या नऊ महिन्यांतील निचांकावर पोहोचला आहे.
दरम्यान येत्या काही महिन्यांत चीनच्या निर्यातीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे जागतिक मागणी कमी होण्याची चिन्हे आहेत. विशेषत: विकसित देशांमध्ये लोक जास्त खर्च करत नाहीत. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस मंदी येण्याची भीतीही वाढली आहे. जरी तज्ज्ञ सांगत आहेत की, ती अगदी किरकोळ असू शकते. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत चीनच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घट झाली आहे. विशेषत: चीनची अमेरिकेला होणारी निर्यात १३ टक्क्यांनी घसरली आहे. अमेरिका हा चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
सावरण्याचे संकेत
अमेरिकन अर्थव्यवस्थेने मंदीमधून सावरण्याचे संकेतही दिले आहेत. त्यात जुलै ते सप्टेंबर तिमाहीत जीडीपीमधील वाढ अंदाजित २.६ टक्क्यांवरून २.९ टक्के केली जाणे, वेतनामधील वाढ ही महागाईच्या दरापेक्षा अधिक असणे, घरांच्या किमती वाढणे यांचा समावेश आहे. एकूणच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडून संमिश्र संकेत मिळत आहेत. त्यामुळे आर्थिक सुस्ती ही मंदीमध्ये परिवर्तित होईल का, हे
सांगणे कठीण आहे.
भारतामधून होणा-या निर्यातीचीही मागणी घटणार
मात्र परिस्थिती सुधारली नाही तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ही मंदीच्या गर्तेत जाऊ शकते. तसेच त्याचा भारतावरही प्रभाव पडणार आहे. त्यामध्ये अमेरिकेतील मागणी घटल्याने भारतामधून होणा-या निर्यातीचीही मागणी घटणार आहे. आयटी, फार्मा आणि वस्त्रोद्योग क्षेत्र अमेरिकन बाजारावर अवलंबून आहे. त्याशिवाय आर्थिक मंदीमध्ये जागतिक पुरवठ्याच्या क्रमात अडथळा आल्यास भारतीय निर्यातदारांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होणार आहे.