भोपाळ : मध्य प्रदेशातील आरटीओ विभागाचे माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्माबाबत सातत्याने नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सौरभ शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी लोकायुक्तांच्या छाप्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने सौरभ शर्मा आणि चेतन सिंह गौड यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोकायुक्तांच्या छाप्यात कारमध्ये ५२ किलो सोन्याची बिस्किटे सापडली होती. तेव्हापासून महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) सोन्याच्या बिस्किटांचा सोर्स शोधण्यात व्यस्त आहे. तसेच, तपास यंत्रणा सौरभ शर्मा दुबईहून परत येण्याची वाट पाहत आहेत. दुबईहून परतल्यानंतर सौरभ शर्मा आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिस आणि आयकर विभागाच्या पथकाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
पथकाने सौरभ शर्माच्या अरेरा ई-७ येथील कार्यालयावर छापा टाकून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यालयासमोरील घरांचे सीसीटीव्ही तपासण्यासाठी पथक पोहोचले असता, ज्या कारमध्ये सोने सापडले होते ती येथून निघून गेल्याचे दिसून आले. याशिवाय, सौरभ शर्माची डायरीही आयकर विभागाच्या हाती लागल्याची चर्चा आहे. या डायरीत वर्षभरात १०० कोटींहून अधिक रुपयांच्या व्यवहारांची नोंद आहे. तसेच, तपास पथकाला या डायरीत यूपीच्या ५२ जिल्ह्यांतील आरटीओची नावे आणि क्रमांक सापडले आहेत.
४० कोटींहून अधिकची चांदी
भोपाळमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन मोठे छापे टाकण्यात आले. त्यातील सर्वात मोठा छापा हा निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्माच्या घरावर होता. छाप्यादरम्यान सौरभ शर्माच्या घरातून २.५ कोटी रुपये रोख आणि ४० कोटी रुपयांहून अधिक किमतीची चांदी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, त्रिशूल कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणाहून तीन कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. अशा परिस्थितीत पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
काळ्या पैशामागील सत्य काय?
सौरभ शर्माचे नाव आता चर्चेचा विषय बनले आहे. ग्वाल्हेरचा रहिवासी असलेल्या सौरभ शर्माला वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर वाहतूक विभागात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली होती. १२ वर्षांच्या सेवेनंतर त्याने व्हीआरएस घेतला आणि रिअल इस्टेट आणि इतर कामात गुंतला होता. दरम्यान, सौरभ शर्माच्या ठिकाणी लोकायुक्तांच्या छाप्यादरम्यान भूमिगत लॉकर सापडले असून त्यात चांदी आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत.