22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीयफारुख अब्दुल्लांना चौकशीसाठी ईडीचे समन्स

फारुख अब्दुल्लांना चौकशीसाठी ईडीचे समन्स

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात समन्स बजावले असून मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे.

आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाच्या विकासाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेला निधी इतरत्र वळवला आणि त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. नंतर निधी आपापसात वाटून घेतला.

किती कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप?
२०१८ मध्ये ईडीने सीबीआयच्या आरोपपत्राच्या आधारे या प्रकरणात पीएमएलएची चौकशी सुरू केली. बीसीसीआय असोसिएशनला ११२ कोटी रुपये दिले होते. त्यातून ४३.६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. २००१ ते २०१२ दरम्यान फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना हा कथित घोटाळा झाला होता.

गेल्या महिन्यातही समन्स पाठविले
लोकसभेत श्रीनगरचे प्रतिनिधित्व करणारे ८६ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांना गेल्या महिन्यातही याच प्रकरणात तपास यंत्रणेने समन्स बजावले होते. त्यावेळी प्रकृतीचे कारण सांगून ते श्रीनगर येथील ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांच्यानंतर फारुख अब्दुल्ला हे नवे विरोधी नेते आहेत, ज्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR