कोल्हापूर : प्रतिनिधी
‘एकमत’चे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांना पत्रकारितेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील मानाच्या समजल्या जाणा-या लोकराजा राजर्षी शाहू गौरव राष्ट्रीय पुरस्काराने (पत्रकारिता) आज (दि. ३० जून) येथील राजर्षी शाहू भवनात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असलेल्या आविष्कार फौंडेशन, इंडियाच्या वतीने दरवर्षी लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्य व राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. भव्यदिव्य अशा या सन्मान सोहळ््यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक सीतायनाकर प्रा. किशनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून इस्रोचे निवृत्त अभियंता आणि सध्याचे इस्रोचे गुजरात युनिटचे प्रमुख नगीनभाई प्रजापती हे होते. यासोबतच विशेष निमंत्रित म्हणून सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष डॉ. एम. बी. शेख, पुण्यातील नेस वाडिया कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी यांच्यासह आविष्कार फौंडेशन इंडिया (कोल्हापूर) संस्थापक उपाध्यक्ष सादतखान पाठणा, संस्थापक संचालक सचिन कामत, मदनभाऊ यादव, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील ऊर्फ नाना, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रंगराव सूर्यवंशी, जिल्हा महिला संघटक सौ. स्नेहल खंकाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आविष्कार फौंडेशन, इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आणि कार्याची माहिती दिली. याप्रसंगी विशेष अतिथी नगीनभाई प्रजापती यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मान्यवरांच्या भाषणानंतर एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांच्यासह इतर सत्कारमूर्तींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय पुरस्कारासह राज्यस्तरीय पुरस्कारानेही विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीला शाहीर प्रकाश लोहार आणि मंडळी यांचा पोवाडा कार्यक्रम झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार ताज मुल्लाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आविष्कार फौंडेशन, इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.