मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिस-यांदा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरी आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
याआधी आदित्य ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशना दरम्यान मुख्यमंर्त्यांची भेट घेतली होती. या सलग भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. सर्वच पोलिस कॅम्पसमध्ये दंडनीय शुल्क लावला आहे. तो शुल्क स्थगित करण्याची मागणी केली. मागच्या सरकारने यावर स्थगित देणार सांगितले होते, पण त्यांनी तसे केले नाही. मुंबई पोलिसांना मुंबईतच घर मिळावेत अशी मागणी केली. तसेच आमच्या सरकारच्या काळात सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती, पण मागच्या सरकारने हे स्थगित केले. ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्याची मागणी केली. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला.
जे घटनाबा सरकार, घटनाबा मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील, अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात पहिल्यांदा पाहिली. लोकांनी ज्यांना झिडकारले, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला. शिव्या, शापाशिवाय ते काय बोलत नव्हते. पहिले सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या, शाप आणि आरोप त्याशिवाय दुसरे त्यांनी काहीच केलेले नाही. तर, आम्ही आरोपांना आरोपांनी उत्तरे दिली नाहीत, आम्ही कामातून उत्तर दिले, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामनाच्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटातील नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.