22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रप्रचारासाठी उमेदवारांच्या कुटुंबीयांची ‘इलेक्शन ड्युटी’

प्रचारासाठी उमेदवारांच्या कुटुंबीयांची ‘इलेक्शन ड्युटी’

मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढत चालली आहे. अशातच विविध उमेदवार आणि नेत्यांच्या आप्तस्वकीयांनी, कुटुंबीयांनीदेखील प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसू लागले. कुठे उमेदवाराची पत्नी, कुठे पती, काही ठिकाणी मुले तर काही ठिकाणी आई-वडील प्रचारात उतरल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राजकारणातील घराणेशाहीचे किस्से संपता संपत नाहीत, मात्र या घराणेशाहीला उमेदवाराच्या प्रचारापासून प्रारंभ होतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक ठिकाणी जे कुटुंबीय पडद्यामागून किंवा थेटपणे प्रचारात जाऊन उमेदवारीचे दावेदार बनतात, असे अनेक प्रकार राज्यात घडलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून, तर त्यांच्या कन्या सना मलिक अणुशक्ती नगर मतदारसंघातून रिंगणात आहेत. सना मलिकांच्या मतदारसंघात नवाब मलिक प्रचारात लक्ष घालून स्वत: अनेक ठिकाणी सहभागी होत आहेत.

नवाब मलिकांचे भाऊ आणि माजी नगरसेवक कप्तान मलिक, बहीण माजी नगरसेविका डॉ. सईदा खान, नवाब मलिकांचे पुत्र फराज आणि अमीर हे सर्व कुटुंबीय प्रचारात सक्रिय झाले आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तर त्यांचे बंधू मालाड पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे आशिष शेलारांच्या पत्नी प्रचारात उतरल्या आहेत.
अबू आझमींच्या प्रचारात त्यांचा मुलगा फरहान आझमी सक्रिय आहे.

अणुशक्ती नगर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार फहाद अहमद यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी अभिनेत्री स्वरा भास्कर सक्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात त्यांचे बंधू माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर सक्रिय झाले आहेत. जोगेश्वरी मतदारसंघातून शिवसेनेने मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली, त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पती खासदार रवींद्र वायकर यांनी सांभाळली. विलेपार्ले मतदारसंघातून विद्यमान आमदार अ‍ॅड पराग अळवणी पुन्हा रिंगणात आहेत, त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका ज्योती अळवणी प्रचारात सहभागी दिसत आहेत. चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या प्रचारात त्यांची मुलगी सुप्रदा फातर्पेकर प्रचारात सक्रिय आहे.

शनाया मुनोत प्रचारात सहभागी
वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे रिंगणात आहेत, त्यांच्यासाठी त्यांचे वडील उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे प्रचारात सहभागी असल्याचे पाहायला मिळत आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेतर्फे वरुण सरदेसाई रिंगणात आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या मावशी रश्मी ठाकरेंचे प्रचारावर लक्ष आहे.
माहीम मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वत: राज ठाकरे यांनी घेतली असून, अमित यांची आई शर्मिला ठाकरे आणि पत्नी मिताली देखील प्रचारात सहभागी असल्याचे पाहायला मिळतेय. मुंबादेवी मतदारसंघातून शिवसेनेतर्फे शायना एनसी निवडणूक रिंगणात आहेत, त्यांचे पती मनीष मुनोत आणि त्यांची मुलगी शनाया मुनोत प्रचारात सहभागी झाल्यात.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून रिंगणातून आहेत. त्यांच्या पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, मुख्यमंत्र्यांची सून प्रचारात सहभागी होत आहेत. मुंब्रा कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि कन्या नताशा सक्रिय झाल्या आहेत.

मुंब्य्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नजीब मुल्ला रिंगणात उभे आहेत, मुल्ला यांच्या प्रचारात त्यांचे बंधू रिझवान मुल्ला आणि कुटुंबीय सहभागी झाले आहेत. ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरनाईक, पुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक प्रचारात उतरले आहेत. ठाणे शहर मतदारसंघातून माजी खासदार राजन विचारे रिंगणात आहेत, त्यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR