21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeराष्ट्रीयसणासुदीमुळे महाराष्ट्रातील निवडणुका उशीरा

सणासुदीमुळे महाराष्ट्रातील निवडणुका उशीरा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र दरवेळी हरियाणासोबत होणा-या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर का टाकण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले असून जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा विचार करून आणि महाराष्ट्रातील सण-उत्सव लक्षात घेत निवडणूक उशिरा घेण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण कुमार यांनी दिले आहे.

मागील पंचवार्षिकला महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या, मग यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुकांना उशीर का? असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान राजीव कुमार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की पूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या. ३ नोव्हेंबर ही हरियाणाची तारीख असून महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे. मात्र मागच्या वेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुका हा मुद्दा नव्हता. यंदा ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांनंतर दिल्ली विधानसभेसाठी मतदान होईल.

यंदा जम्मू-काश्मीरच्याही निवडणुका होत असल्याने आणि तिथे लागणा-या यंत्रणेचा विचार करता आम्ही दोन-दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला. तसेच जम्मू-काश्मीरची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच मध्येच दुस-या राज्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या निवडणुका उशिरा घेण्यामागे इतरही कारणे आहेत. काही दिवसांनी गणोशोत्सव, पितृपक्ष, दिवाळी असे सणही येत आहेत. त्यामुळे आम्ही निवडणूक कार्यक्रमाचे त्या अनुषंगाने नियोजन करत आहोत अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर रोजी, दुस-या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबर आणि तिस-या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर हरियाणातील निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून १ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांतील मतमोजणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदा जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर निवडणुका होणार असून एकूण ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जम्मूतील ४३ आणि काश्मीरमधील ४७ जागांचा समावेश असणार आहे. निवडणूक आयोगाने जम्मूमधील सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूर या भागातील एक-एक जागा वाढवण्यात आली असून काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक विधानसभा मतदारसंघ वाढवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR