28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजातीय समिकरणांमुळे फडणवीसांना निवडणूक जड जाणार!

जातीय समिकरणांमुळे फडणवीसांना निवडणूक जड जाणार!

नागपूर : विशेष प्रतिनिधी
नागपूरमध्ये २००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि दक्षिण-पश्चिम नागपूर असा एक नवीन मतदारसंघ तयार झाला. २००९ पासून देवेंद्र फडणवीस येथून सलग निवडून येत आहेत. २००९ मध्ये त्यांनी २७ हजार मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला होता.

२०१४ मध्ये ५८ हजारांचं मताधिक्क्य घेत मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. मात्र २०१९ पासून या मतदारसंघात भाजपच्या मताधिक्क्यात घसरण झाली. आशिष देशमुख यांच्यासारखा नवखा उमेदवार विरोधात असताना देवेंद्र फडणवीसांचं मताधिक्य आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत ९ हजारांनी कमी झालं होतं. आता २०२४ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीतही फडणवीसांच्या मतदारसंघात नितीन गडकरींची लीड ३२ हजार मतांनी कमी झाली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची च्ािंता वाढली आहे.

जातीय समीकरणांचे आव्हान?
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ ओबीसीबहुल आहे. त्यातही कुणबी मतदारांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ अनुसूचित जाती आणि ब्राह्मण मतदार येतात. इथला अनुसूचित जातीचा मतदार कधीच भाजपच्या बाजूने नव्हता. २००९ ला भारीप बहुजन महासंघ आणि अपक्ष उमेदवार असे दोघांनी मिळून जवळपास २० हजारांच्या घरात मतं घेतली. २०१४ च्या निवडणुकीतही बसपच्या उमेदवाराला १७ हजारांच्या घरात मते पडली होती.

कुणबी-ओबीसी फॅक्टरचे आव्हान
कुणबी मतदारांचा देवेंद्र फडणवीसांना नेहमीच पाठिंबा मिळत आला. पण, गेल्या ५ वर्षात स्थिती इतकी बदलली की, हाच कुणबी आणि ओबीसी फॅक्टर देवेंद्र फडणवीसांसाठी मोठे आव्हान बनला आहे. २०१९ पर्यंत ओबीसींचा मुद्दा इतका चर्चेत नव्हता. पण, स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे आरक्षण गेले. परिणामी ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी झाले. ओबीसींची जातगणनासुद्धा झाली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांत ओबीसी केंद्रस्थानी आला आहे. त्यात फडणवीस यांनी अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासारखे ओबीसी नेते टार्गेट केले. इथल्या कुणबी समाजाचा देखील देवेंद्र फडणवीसांवर रोष पहायला मिळतो. तथापि, फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे, त्याचा फायदा होतो का ते पहावयाचे.

दलित मतदारांवर लक्ष
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ओबीसीनंतर अनुसूचित जातीचे मतदार आहेत. आता फडणवीसांनी या मतदारांवर लक्ष केंद्रीत केलेले दिसते. कारण, त्यांच्या मतदारसंघातील ३७८ बूथपैकी जिथं अनुसूचित जातीचे मतदार अधिक आहेत अशा १०० बूथवर ‘देवेंद्रदूत’ नेमले आहेत. एकंदरीत ही बदललेली स्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी निवडणूक कशी असेल? तर आजवरच्या सर्व निवडणुकांपेक्षा २०२४ ची निवडणूक फडणवीसांना अवघड जाणार असे दिसते. इथले जातीय समीकरण सुद्धा त्यांच्या बाजूने नाही. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे.

फडणवीसांच्या जमेच्या बाजू
देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलेली विकासकामं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. यात मानकापूर स्पोटर््स कॉम्प्लेस, विमानतळ नुतनीकरण हे सगळे विकासाचे मुद्दे येतात. शिवाय फडणवीसांनी आणि भाजपने केलेल्या कामाचा उल्लेख करत ‘धन्यवाद देवाभाऊ’ असे मोठमोठे बॅनर नागपुरात लागले आहेत. विकासकामे घेऊनच फडणवीस निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक जातीय समीकरणे विरुद्ध विकासकामे अशी लढली जाणार असे दिसते.

प्रफुल्ल गुडधे की अनिल देशमुख?
फडणवीसांसमोर महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असेल? हे मात्र अद्याप ठरलेलं नाही. पण यासाठी दोन नावांची चर्चा आहे. पहिलं म्हणजे काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे. प्रफुल्ल गुडधे या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. ते कुणबी असून इथल्या जातीय समीकरणात फीट बसतात. त्यांचं या मतदारसंघात नेटवर्कही आहे. शिवाय भाजपचे आमदार राहिलेल्या विनोद गुडधे पाटलांची राजकीय परंपरा देखील त्यांच्या पाठीमागे आहे. तथापि, काँग्रेस हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार अशाही चर्चा आहेत. शरद पवार गटाकडून या मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता दिसते. कारण, ते त्यांचा मतदारसंघ पुत्र सलील देशमुख यांना सोडण्याची शक्यता आहे. आता या दोन चर्चेतल्या नावापैकी कोणाला उमेदवारी मिळते त्यावरून फडणवीसांसाठी निवडणूक किती सोपी आणि किती अवघड याचं गणित मांडणं आणखी सोपे जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR