जिंतूर : मुलींनो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या धाडसी व्हा. विविध क्षेत्रात भरारी घ्या आणि आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा घेत समाज घडवण्याचे कार्य करा. तसेच स्त्रियांनी बंदिस्त वातावरणात न राहता स्वत:ला घडवण्यासाठी बाहेर पडा. पुस्तकांचे वाचन करून ज्ञान समृद्ध करा असे प्रतिपादन प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांनी केले.
जिंतूर येथील संत सावता महाराज सभागृहात सावित्रीबाई फुले महिला बचत गटातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीना तायडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सचिन राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. अनुराधा लांडगे यांचा वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तर मीना कंठाळे यांचा उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून बचत गटातर्फे सत्कार करण्यात आला. निकिता गुंजाळकर या विद्यार्थिनींने मी सावित्रीबाई बोलते हा अभिनय सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
प्रास्ताविक प्रा.डॉ. अशोक वैद्य, सूत्रसंचालन प्रकाश डूबे तर आभार प्रदर्शन संजय जवळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता पाचलेगावकर, सुमन लांडगे, लता राऊत जयश्री गोरे, मीनाक्षी पाचलेगावकर, सविता इंगोले, ज्योती वैद्य, उषा मुंजे, शोभा कटारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पुरुष, महिला रसिक श्रोते उपस्थित होते.