23.1 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील ८ लाख विद्यार्थ्यांच्या आधारकार्डांमध्ये त्र्युटी

राज्यातील ८ लाख विद्यार्थ्यांच्या आधारकार्डांमध्ये त्र्युटी

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती साडे तीन लाख विद्यार्थी आधारकार्डाविना

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची माहिती यू-डायस प्लस प्रणालीच्या माध्यमातून जोडण्यासाठी त्यांच्या आधार प्रमाणीकरण (आधारकार्ड क्रमांक पडताळणी) करण्याच्या प्रक्रियेत तब्बल आठ लाख सात हजार ८२५ विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड आणि त्यांच्या क्रमाकांच्या माहितीमध्ये विसंगती, त्रुटी आढळल्या असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल तीन लाख ३४ हजार १८२ विद्यार्थी आधारकार्डविना असल्याची माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाण­ीकरणाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानसभा सदस्य विकास ठाकरे, संजय जगताप, अस्लम शेख आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात केसरकर यांनी आठ लाख सात हजार ८२५ विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीमध्ये विसंगती असून त्यातील त्रुटी, तफावत दूर करून आधार क्रमांक वैध करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली. राज्यात शिक्षण घेत असलेल्या दोन कोटी १२ लाख २८ हजार ६७६ विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीअंती दोन कोटी ८६ हजार ६७१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक वैध ठरले, तर उर्वरित ११ लाख ४२ हजार पाच विद्यार्थ्यांपैकी तीन लाख ३४ हजार १८२ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड उपलब्ध नसल्याची माहितीही शिक्षण मंत्र्यांनी दिली.

८१६ आधार संच उपलब्ध
ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांक पडताळणी झाली नाही, अशा विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर कोणत्याही योजनांपासून वंचित ठेवले जात नाही. विभागामार्फत प्रत्येक गट साधन केंद्रावर दोन असे एकूण ८१६ आधार संच उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही केसरकर यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR