मुंबई : सैफ अली खानवरील हल्ल्याचा मुद्दा बाजूला जाऊन नवाच वाद निर्माण होताना दिसत आहे. महायुतीतील दोन नेत्यांनी एकूणच हल्ल्याबद्दल आणि सैफ अली खानला झालेल्या जखमेबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांच्यापाठोपाठ मंत्री नितेश राणे यांनीही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले.
एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणे म्हणाले की, आज सैफ अली खानला पाहिल्यानंतर मला संशय आला. तो बाहेर येऊन असा चालत होता की, मलाच शंका आली. याला खरंच चाकू मारला की, अभिनय करत होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर टुणूक टुणक चालत होता. वाटतंच नव्हते की, त्याच्यावर चाकू हल्ला झाला आहे असे नितेश राणे बोलले. त्यानंतर वादविवाद सुरू झाला.
चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले?
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या विधानावर बावनकुळे म्हणाले, मला असं वाटतं की त्यांच्यावर डॉक्टरांनी रुग्णालयात उपचार केले आहेत. त्यावर शंका घेण्याची गरज नाहीये. पण, इतकी मोठी जखम आहे, तर इतक्या लवकर बरी कशी झाली. याबद्दल एक विधान आले आहे. पण, डॉक्टरांच्या वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कान टोचले.