क्यूरेटारो : आज केवळ अयोध्या किंवा भारतच नाही, तर संपूर्ण जग राममय झाले आहे. दरम्यान मेक्सिकोमध्ये यानिमित्ताने पहिल्याच राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अमेरिकी पंडिताने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पाडली.
मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. २१ जानेवारी रोजी सायंकाळी हा सोहळा पार पडला. मेक्सिकोमधील क्यूरेटारो या शहरात हे राम मंदिर उभारण्यात आले आहे. या सोहळ्याला मेक्सिकन नागरिक देखील उपस्थित होते.
या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. या मूर्ती भारतातून मागवण्यात आल्या होत्या. यावेळी मेक्सिकोमधील कित्येक भारतीय नागरिक मंदिरात उपस्थित होते. पूजा-आरती केल्यानंतर रामनामाचा जप करण्यात आला. यावेळी संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न होते, असेही भारतीय दूतावासाने म्हटले.