21 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीतही जागांवरून पेच

महायुतीतही जागांवरून पेच

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत दाखल,फडणवीसांचीही वारी

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीपाठोपाठ आता महायुतीत जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजपसोबत काही जागांवरून तिढा निर्माण झाल्याने हे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. जेवढे आमदार सोबत आहेत, तेवढ्याचा जागा अजित पवार यांनी घ्याव्यात, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाली आहे. त्यामुळे या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीसारखीच स्थिती आता महायुतीच्या जागावाटपात दिसू लागली आहे. मविआत काँग्रेस आणि ठाकरेसेनेत काही जागांवरून वाद आहेत तर महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही जागांवरून तिढा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज अचानक दिल्लीला रवाना झाले. तिथे ते भाजप श्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. काल रात्री अजित पवारांशिवाय झालेली महायुतीची बैठक, त्यानंतर आज अजित पवारांनी अचानक केलेला दिल्ली दौरा यामुळे महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपने ९९ नावांचा समावेश असलेली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्यांच्याकडून १७ जणांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ६० ते ७० जागांसाठी आग्रही आहे तर भाजप १५० जागांच्या खाली येण्यास तयार नाही. तसेच शिंदेसेनाही ८० ते ८५ जागांची मागणी करत आहे. त्यामुळे पेच कायम आहे. जागावाटप मार्गी लागलेले नाही.

अजित पवार यांना वगळून महायुतीची बैठक!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री भेट झाली. रात्री उशिरा झालेल्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. जागावाटपाची बैठक अजित पवारांशिवाय झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे अजित पवारांना डावलून महायुतीत वेगळे काही शिजत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदारांच्या संख्येनुसारच जागा घ्या, भाजपचा आग्रह
तुमच्यासोबत जितके आमदार आहेत, तितक्याच जागा घ्या किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक जागा घ्या, असे भाजपकडून अजित पवारांना सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर आता अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

फडणवीसही दिल्लीत
एकीकडे अजित पवार राजधानी दिल्लीत दाखल झालेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही रात्री दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण दिल्लीत जात असल्याचे म्हटले. परंतु या भेटीत महायुतीतील वादासोबतच भाजपच्या दुस-या यादीवर खल होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR