परभणी : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत कमी पर्जन्यमान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय शासनाने घेतला होता. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एकूण ७५ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीची मंजुरी मिळून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्यापेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे. अशा १०२१ महसूली क्षेत्रात दुष्काळसदृश्य घोषित केलेले आहे. सदर शासन निर्णयामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत लागू केली आहे.
या अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होऊन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. विद्यार्थ्यांची अशी फिस माफी होणारे जिल्ह्यातले पहिले महाविद्यालय ठरले आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जाधव यांनी उच्च शिक्षण मंत्रालायचे आभार मानले. यासाठी महाविद्यालयातील रवी कावळे, रविंद्र तिळकरी, गजानन जाधव, केशव कैलेवाड यांनी प्रयत्न केले.