23.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रउत्कंठापूर्ण लढती, प्रचार मोहिमेतील दावे-प्रतिदाव्यांनी वातावरण ढवळले!

उत्कंठापूर्ण लढती, प्रचार मोहिमेतील दावे-प्रतिदाव्यांनी वातावरण ढवळले!

पुणे : विनायक कुलकर्णी
विधानसभेची निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली असून निकालाबाबत दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत तसेच महायुती आणि महाविकास आघाडी आणि अन्य पक्षाच्या वतीने प्रचार मोहिमेच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढण्यात येत आहे.

रोड शो, जाहीर सभा, मेळावे, पथनाट्य आदि माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. या सा-या बाबी असल्या तरी सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे या निवडणुकीत मत विभाजनाचा फायदा नेमका कोणाला आणि किती प्रमाणात मिळणार आहे.

शहर आणि जिल्ह्याचा विचार करता एकूण २१ विधानसभा मतदार संघ आहेत त्यातील अकरा मतदार संघ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्दीत तर ऊर्वरित दहा मतदार संघ हे ग्रामीण भागात आहेत. शहरातील एकूण आठ मतदार संघात कसबा पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासला, वडगाव शेरी हडपसर, आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदार संघाचा आणि पिंपरी, चिंचवड व भोसरी हे तीन मतदार संघ मिळून एकूण ११ मतदार संघाचा समावेश होतो. याखेरीज जिल्ह्यात १० विधानसभा मतदार संघ आहेत म्हणजेच एकूण २१ मतदार संघ जिल्ह्यात आहेत.

या २१ विधानसभा मतदार संघाची सध्याची राजकीय स्थिती पहिली तर भारतीय जनता पक्षाकडे आठ राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष (अजित पवार) गट -९, शरद पवार गट -१, आणि कॉँग्रेस पक्ष ३ जागा अशी स्थिती आहे या निवडणुकीनंतर जिल्ह्याचे राजकीय चित्र कसे असणार हा सध्या चर्चेचा विषय राहिला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली आणि त्यामध्ये राज्यात महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिला आणि जिल्ह्यात चार पैकी महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन-दोन जागा मिळाल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकीत आणि त्यातही पुणे शहर आणि जिल्ह्यात कसे प्रतिबिंब उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी बहुतांश प्रमाणात विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली असल्याने इच्छुकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती. त्यांची समजूत काढण्यात पक्ष नेतृत्वाला यश मिळाले असल्याचे मानले जात आहे. त्यातुलनेत नवीन चेह-यांना कमी प्रमाणात संधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून देण्यात आली असल्याचे दिसते.

गेल्या काही महिन्यात राज्य शासनाने लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात सादर केली. त्या मध्यमातून महिला सबलीकरण योजनेला अधिक प्रमाणात बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदारांकडून किती प्रमाणात योजनेला प्रतिसाद मिळाला हे मतदानाच्या टक्केवारीवरून लक्षात येईल. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये कसोटी लागली आहे. कारण, जिल्ह्यातील काही मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यात बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, हडपसर, वडगाव शेरी या मतदार संघाचा समावेश आहे.

आंबेगाव मतदार संघात विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे देवदत्त निकम तर जुन्नर मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आणि विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचालक सत्यशील शेरकर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके, हडपसर मध्ये आमदार चेतन तुपे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, तर वडगाव शेरी मतदार संघात आमदार सुनील टिंगरे आणि भाजपातून बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बापू पठारे यांच्यातील लढती उत्कंठा पूर्ण होणार आहेत.

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जेष्ठ नेते शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदि राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR