न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा एकामागून एक मिशन लॉन्च करत आहे. आता नासा गुरू ग्रहावर एलियनचा शोध घेणार आहे. आज, म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी गुरू ग्रहकाचा चौथा सर्वात मोठा चंद्र युरोपासाठी नासाची नवीन मोहीम सुरू होत आहे. युरोपा क्लिपर नावाचे हे यान गुरुच्या चंद्राचा सविस्तर अभ्यास करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गुरुच्या चंद्रावर जीवसृष्टी असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचादेखील शोध घेतला जाईल. युरोपावर जीवसृष्टी शोधणे, हा या युरोपा क्लिपर मिशनचा मुख्य उद्देश आहे. १६१० मध्ये गॅलिलिओ गॅलीलीने या युरोपाचा शोध लावला होता. हा ब-याच काळापासून खगोल शास्त्रज्ञांचा आकर्षणाचा विषय आहे. शास्त्रज्ञांनी यापूर्वीच युरोपाच्या जाड बर्फाळ कवचाखाली एक मोठा महासागर शोधला आहे.
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन हेवी रॉकेटच्या सहाय्याने फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून या यानचा प्रवास सुरू होईल. उड्डाण केल्यानंतर ते प्रथम मंगळाच्या दिशेने जाईल आणि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुरुत्वाकर्षणाच्या मदतीनेते आपला वेग वाढवून पृथ्वीच्या दिशेने येईल. यानंतर डिसेंबर २०२६ मध्ये पुन्हा एकदा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने ते गुरुच्या दिशेने झेप घेईल.
युरोपा क्लिपर ११ एप्रिल २०३० पर्यंत गुरू ग्रहावर पोहोचेल. विशेष म्हणजे, हे अंतराळ यान बनवण्यासाठी ५ अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. शास्त्रज्ञांनी जर्नल ऑफ गाईडन्स, कंट्रोल अँड डायनामिक्समध्ये प्रकाशित केलेल्या पेपरमध्ये म्हटले आहे की, यान ११ एप्रिल २०३० रोजी गुरूच्या जवळ पोहोचेल आणि गुरूच्या लांब वळणावळणाच्या कक्षेत प्रवेश करेल.
कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील वायुमंडलीय आणि अंतराळ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेनुसार, ऑर्बिट अॅडजस्ट करण्यासाठी १ वर्ष लागेल. यान युरोपाभोवती ५० वेळा फिरेल. त्याचबरोबर फ्लायबायच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना चंद्रावरील बर्फ, समुद्राची संभाव्य खोली आणि राहण्याची क्षमता यांचे विश्लेषण करण्याची संधी मिळेल.