नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतक-यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे.
देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि ३१ मार्च २०२४ ही अंतिम मुदत ठेवली होती, परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. बंदी हटवण्याच्या कारणाबद्दल बोलायचे झाल्यास गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा स्टॉक पाहात सरकारकडून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी कंद्रीय गृहमंत्र्यांना शेतक-यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली होती, यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी देखील केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात होते. कांद्याच्या किमती कोसळल्याने देखील निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे. आता केंद्रीय मंत्री समितीने बंदी हटवण्यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला देखील मंजुरी दिली आहे. यासोबत बांगलादेशमध्ये देखील ५० हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कांद्याचे कमी उत्पादन आणि भरमसाठ वाढलेल्या किमतींमुळे केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात ८ तारखेला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही बंदी असल्याचे सांगण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात कांद्याच्या किमती वेगाने वाढल्या होत्या. कांदा १०० रुपये किलो विकला जात होता. यानंतर सरकारच्या प्रयत्नांनंतर कांद्याच्या किमती कमी झाल्या होत्या.