लखनौ : बहुजन समाज पक्षाने खासदार दानिश अली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. बसपाने दानिश अली यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी अमरोहाचे लोकसभा खासदार दानिश अली यांना पत्र लिहून त्यांना बसपच्या सदस्यत्वावरून तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मिश्रा यांनी पत्रात लिहिले आहे की, दानिश अली यांना पक्षाची धोरणे, विचारसरणी आणि शिस्तीच्या विरोधात जाणारे कोणतेही विधान करू नका असे तोंडी सांगण्यात आले होते, परंतु ते सतत पक्षाच्या विरोधात काम करत आहेत.
तसेच पत्रात दानिश अली यांना उद्देशून मिश्रा यांनी लिहिले आहे की, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या विनंतीवरून तुम्हाला अमरोहा येथून बसपाचे उमेदवार म्हणून तिकीट देण्यात आले होते. बसपाचे तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही पक्षाची सर्व धोरणे आणि सूचनांचे पालन करून पक्षहितासाठी काम करू, असे आश्वासन देवेगौडा यांनी दिले होते. तुम्ही त्यांनाही याची पुनरावृत्ती केली होती, पण ते आश्वासन विसरून तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात.
संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान सप्टेंबर २०२३ मध्ये भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर अनेक प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. दानिश अली यांनीही शुक्रवारी (८ डिसेंबर) संसदेबाहेर टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांच्या बाजूने निदर्शने केली होती.