सोलापूर : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटी स्कॅन, एमआरआयची सोय तत्काळ सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटी स्कॅन, एमआरआय मशीन गेल्या एक वर्षापासून बंद आहे. याठिकाणी शहर-जिल्हा व सभोवतालच्या जिल्ह्यातून तसेच शेजारील कर्नाटक, हैदराबाद आंध्र व इतर राज्यांमधून बहुसंख्य गोरगरीब रुग्ण उपचाराकरीता येत असतात. परंतु या रुग्णालयामधील सिटी स्कॅन व एमआरआय मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन व एमआरआय करण्याकरीता भरमसाठ पैसे द्यावे लागत आहेत. सदर रुग्णांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन करू शकत नाहीत. याकरीता तातडीची बैठक बोलावून सिव्हिल हॉस्पिटल येथे तत्काळ सिटी स्कॅन व एमआरआय मशीन सुरु करण्याकरीता आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.
याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सांगितले की, मंत्रिमंडळाने सिटीस्कॅन, एमआरआय व पॅथॉलॉजीसाठी मशीनची व्यवस्था करण्यास परवानगी दिलेली आहे. याबाबत लवकरच निविदा काढण्यात येत आहे आणि रुग्णांना लवकरच सरकारी दरामध्येच या सुविधा मिळतील, असे आश्वासन दिले.