छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटली नव्हती. त्यांनी स्वराज्यसाठी आक्रमण केले होते, पण विरोधकांकडून चुकीचा इतिहास पसरवला जात आहे, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावरून फडणवीसांना चुकीचे शिक्षक मिळाले, यात महाराष्ट्राचा दोष काय? असा चिमटा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काढला आहे.
दरम्यान, काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यभरात महायुतीच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटलीच नव्हती, काँग्रेस आणि विरोधक चुकीचा इतिहास पसरवत आहेत. असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून आता राज्यात राजकारण सुरु झाले आहे. फडणवीसांच्या या इतिहासानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांच्या विधानाचा दाखला देत टोला लगावला.
महाराज स्वराज्याच्या बळकटीसाठी दोन वेळेला सुरतेवर चालून गेले. एकदा १६६४ आणि दुस-यांदा १६७० मध्ये. त्याला बोलीभाषेत कोणी लूट म्हणते, तर कोणी आक्रमण. आता तुम्हाला चुकीचे शिक्षक भेटले असतील त्यात महाराष्ट्राच्या जनतेचा काही दोष नाही.
हा.. मात्र महाराजांना हे तेव्हा बहुदा माहिती नव्हते की स्वातंत्र्यानंतर देशात औरंगजेब आणि अहेमदशाह अब्दाली एकाच काळात जन्माला येतील, अन् महाराष्ट्राचे उद्योग पळवतील, अशा शब्दात सुनावले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल माफी मागितली. त्यानंतरही सुरतेवर शिवाजी महाराज यांनी कधीच लूट केली नाही, ते एक आक्रमण होते. मात्र काँग्रेसने लूट हा शब्द शिकवला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.