चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावे असे विधान करत काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सीएम फडणवीस यांचे कौतुक केले. चंद्रपूरातील एका कार्यक्रमात काँग्रेस आमदार वडेट्टीवार यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी भविष्यात फडणवीस यांनी देशाचे नेतृत्व करावे, असे विधानही केले. चंद्रपूर येथे लोकनेते कर्मवीर मारोतराव कन्नमवारजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, एका माजी मुख्यमंत्र्यांच्या १२५ व्या जयंतीला जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी ते आले आहेत, हा मोठेपणा असतो. त्यावेळी आम्ही मारोतराव कन्नमवारजी यांच्याकडे यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून बघायचो, आता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावे असे विधान करत त्यांनी सीएम फडणवीस यांचे कौतुक केले.
पाच वर्षाच्या जिल्ह्याच्या विकासाला किशोर यांनी जो प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे. मारोतराव कन्नमवारजी यांनी मुख्यमंत्री काळात मोठं काम केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची सुरुवात त्यांच्याकडून झाली. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री तेच झाले होते. त्यांनी विकासाची पायाभरणी केली, या विकासाचे कळस म्हणून देवेंद्रजी काम करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे असे कौतुकही विजय वडेट्टीवार यांनी केले.
आपण भविष्यात देशाचे नेतृत्व कराल
आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, जे काम मारोतराव कन्नमवारजी यांनी केले, त्या कामाला यांनी पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक म्हणून स्विकारले पाहिजेत. आपण भविष्यात देशाचे नेतृत्व कराल असे मोठे विधानही वडेट्टीवार यांनी केले. मारोतराव कन्नमवारजी यांनी खूप कष्टातून सुरुवात केली आहे. पेपर वाटण्यापासून सुरुवात केली. ते पुढे मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले होते असेही वडेट्टीवार म्हणाले.