पुणे : बीडमधील खून प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्याची न्यायालयीन, एसआयटी, तसेच सीआयडी, अशा ३ स्तरांवर चौकशी सुरू आहे. कोणतेही पक्षीय राजकारण न आणता हा तपास होईल, दोषींना शासन होईल, कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या एकाही खासदाराबरोबर आम्ही संपर्क साधलेला नाही, असे ते म्हणाले.
पवार यांनी गुरुवारी सकाळपासूनच पुण्यात बैठकांचा धडाका लावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी सकाळी ०६:३० वाजता बैठक घेतली. त्यानंतर विश्रामगृहात विविध सरकारी कार्यालयांच्या बैठका घेतल्या. या बैठकांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बीड प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, मंत्री मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, कोणीही कोणावर कसलेही आरोप केले, तर लगेच संबंधिताला दोषी म्हणता येणार नाही. ते प्रकरण गंभीर आहे. त्याची तीन स्तरांवर चौकशी सुरू आहे. कोणी आरोप करत असेल, तर त्यांनी पुरावे समोर आणावेत. मुख्यमंत्र्यांबरोबर यासंदर्भात बोललो आहे. तेही माझ्याच विचारांचे आहेत. पक्षीय राजकारण न आणता कोणी कितीही मोठा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही.
बड़ी मुन्नी कोण? हे मला का विचारता? ज्यांनी ते नाव घेतले त्यांनाच विचारा. अशा फालतू गोष्टींना मी काहीही किंमत देत नाही, असे पवार म्हणाले. आमच्या पक्षातील कोणीही दुस-या पक्षातील कोणत्याही खासदाराबरोबर संपर्क साधलेला नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसे स्पष्ट सांगितले आहे. इतकेच नाही, तर त्यांचे खासदार नीलेश लंके व अन्य कोणीही आमच्याबरोबर बोललेले नाही असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. त्यांचे चिन्ह वेगळे, माझे चिन्ह वेगळे, असे पवार यांनी ठामपणे सांगितले.
आमच्या पक्षाला जनतेने मते दिली. आमचे लोक निवडून दिले. त्यामुळे आता काम करण्याची जबाबदारी आमची आहे. ते आम्ही करतो आहोत, असे ते म्हणाले. बीडचे पालकमंत्रिपद तुम्ही घेणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी, तो अधिकार मुख्यमंर्त्यांचा आहे, ते ३६ जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देतील, त्याप्रमाणे पालकमंत्रिपद दिले जाईल असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.