पुणे : प्रतिनिधी – स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही त्यांच्या हातून घडावी, अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी श्री गोविंददेव गिरिजी महाराज यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.
आळंदी येथे गीताभक्ती अमृतमहोत्सवात ते बोलत होते. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महाराज, ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर, राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रामदेव बाबा उपस्थित होते.
ते म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी भागवत धर्माची पताका फडकत ठेवली. ज्या भूमीतून हे कार्य झाले त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत अनेक संत एकत्रित आले आहेत.
संतांनी आपले जीवन भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या प्रसारासाठी दिले. माऊलींच्या भूमीत गीता प्रसाराचे कार्य करणा-या विद्वानाचा सत्कार होणे हा चांगला योग आहे. स्वामी श्री गोविंददेव गिरी यांनी राष्ट्राचा आणि सृष्टीचा विचार केल्याने त्यांच्या अभीष्टचिंतनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे.
स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी अध्यात्म विचाराच्या प्रसाराचे कार्य केले आहे. त्यांच्या हातून यापुढे देशसेवा घडावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या.