नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट औषधांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी दोन आरोपी दिल्लीतील एका मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण नऊ ब्रँडची बनावट कॅन्सरची औषधे जप्त केली आहेत. यातील सात औषधे विदेशी ब्रँडची आहेत तर दोन बनावट औषधे भारतातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हॉस्पिटलमधील रुग्णांना केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणा-या इंजेक्शनच्या रिकाम्या बॉटल्स गोळा करायचे, नंतर त्या बॉटल्समध्ये अँटीफंगल औषध भरून विकायचे. दिल्लीबाहेरून येणारे रुग्ण, विशेषत: हरियाणा, बिहार, नेपाळ किंवा आफ्रिकन देशांतून येणा-या रुग्णांना हे आरोपी आपल्या जाळ्यात अडकवायचे.
सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये विफल जैन, सूरज शत, नीरज चौहान, परवेझ, कोमल तिवारी, अभिनय कोहली आणि तुषार चौहान अशी त्यांची नावे आहेत. यातील नीरज हा गुरुग्रामचा रहिवासी आहे तर उर्वरित सहा दिल्लीतील विविध भागातील रहिवासी आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष आयुक्त शालिनी सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या टीमला माहिती मिळाली आहे की दिल्लीत एक टोळी सक्रिय आहे, जी रुग्णांना कॅन्सरची बनावट औषधं पुरवत आहे. यानंतर आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले.
गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता त्यांना चार वेगवेगळ्या ठिकाणांहून हे नेटवर्क चालवले जात असल्याची माहिती मिळाली. आरोपींना पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून पोलिसांनी चारही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्याचे नियोजन केले. मोती नगर, दिल्लीचे डीएलएफ कॅपिटल ग्रीन्स, गुडगावची साऊट सिटी, दिल्लीचे यमुना विहार यांचा समावेश होता.
दिल्ली पोलिसांच्या पथकाने या रॅकेटचा सर्वांत महत्त्वाचा अड्डा असलेल्या डीएलएफ कॅपिटल ग्रीन्सवर छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विफल जैन हा येथे कॅन्सरची बनावट औषधे बनवत असे. या संपूर्ण टोळीचा म्होरक्याही विफल होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने डीएलएफ ग्रीन्समध्ये दोन ईडब्ल्यूएस फ्लॅट भाड्याने घेतले होते. याठिकाणी तो कॅन्सरच्या औषधाच्या रिकाम्या बॉटल्स बनावट औषधांनी भरायचा तर त्याचा साथीदार सूरज या रिफिल केलेल्या बॉटल्स व्यवस्थित पॅक करून ठेवायचा जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.