कच्छ : गुजरातमध्ये फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी बनावट पंतप्रधान कार्यालय अधिकारी तर कधी बनावट न्यायाधीश आणि बनावट न्यायालयाद्वारे फसवणूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच आता गुजरातमध्ये बनावट अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी सापडले आहेत. कच्छच्या गांधीधाममध्ये ईडीच्या बनावट पथकाने पोलिसांनी पकडले आहे.
ईडीच्या बनावट पथकाचा पर्दाफाश झाल्यानंतर एका महिलेसह १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी ईडीचे बनावट अधिकारी असल्याचे भासवत बड्या उद्योगपतींवर छापे टाकण्याची योजना आखत होते. छापे टाकून धमकावून व्यावसायिकांकडून लाखो रुपये उकळण्याचे काम या टोळीकडून करण्यात येत होते. आरोपींनी नुकतेच ईडीचे अधिकारी असल्याचे दाखवून एका ज्वेलर्स फर्मवर छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. या बनावट कारवाईदरम्यान हे लोक २५ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन बेपत्ता झाले होते.
छापेमारीनंतर व्यावसायिकाला हे बनावट ईडी अधिकारी असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. आरोपींना पकडल्यानंतर या लोकांनी १५ दिवस अगोदरच धाडी टाकण्याची योजना आखल्याचे समोर आले. गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आहे.
पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांचे सोने आणि गाड्या जप्त केल्या आहेत. आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्याही लक्ष ठेवले जात होते. आरोपींना पकडण्यासाठी गुप्तहेर कामाला लावण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बनावट ईडी टोळीचा पत्ता लागला. मात्र एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पुढे आली आहे.