नवी दिल्ली : हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकरी नेत्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय मागे घेतला. अंबाला रेंजचे आयजी सिबाश कबिराज यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. याआधी गुरुवारी अंबाला पोलिसांनी आंदोलनादरम्यान सरकारी मालमत्तेच्या नुकसानाची आंदोलक शेतकरी नेत्यांकडून भरपाई केली जाईल, त्यासाठी त्यांची मालमत्ता जप्त करून बँक खाती जप्त करण्यात येतील असे ते म्हणाले होते.
पंजाब-हरियाणाच्या खानौरी सीमेवर २१ वर्षीय शुभकरणच्या मृत्यूच्या निषेधार्थ शेतकरी शुक्रवारी देशभरात ब्लॅक डे पाळत आहेत. गुरुवारी साडेचार तास चाललेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १०० शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. २६ तारखेला देशभरात ट्रॅक्टर मोर्चा आणि १४ मार्चला दिल्लीत महापंचायत घेण्याचे मान्य केले.
दिल्ली मोर्चाचा आज निर्णय
शेतकरी आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे. किसान-मजदूर मोर्चा आज दिल्ली मोर्चाबाबत निर्णय घेणार आहे. २१ फेब्रुवारीला खनौरी सीमेवर युवक शुभकरणचा मृत्यू झाल्यानंतर शेतक-यांनी दिल्ली मोर्चा थांबवला होता.