27.3 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीने वाढवली राज्याची चिंता

शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीने वाढवली राज्याची चिंता

अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक काही केल्या पुसता येत नसल्याचे चित्र आहे. यावर्षीच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. गेल्या चार महिन्यांतील आकडेवारीने शेती, शेतक-यांची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे. २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत.

अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्येचा कलंक काही केल्या पुसता आलेला नाही. यंत्रणा, प्रशासन, सरकार सर्वच सपशेल फेल ठरले आहेत. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्याची नोंद समोर आली आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात ८४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत.

या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलडाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आर्थिक मदतीसाठी प्रतीक्षा
तर दुसरीकडे ८३८ पैकी यात १७१ शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध आढळली. त्यात आतापर्यंत फक्त १०४ शेतक-यांनाच १ लाख आर्थिक मदत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर ६०५ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. राज्यात आरोप-प्रत्यारोप आणि पळवापळवीच्या राजकारणात सरकार व्यस्त असल्याने शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही? असा सवाल शेतकरी कुटुंबियांकडून केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR