23.3 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeमहाराष्ट्रशक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

कोल्हापुरात धरणे आंदोलन

कोल्हापूर : प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्याने कोल्हापुरातील शेतक-यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा नेणार, याचे नोटिफिकेशन काढा अशी मागणी करत शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेती आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, शेतकरी वाचवा- देश वाचवा, जय जवान-जय किसान, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड व आजरा या सहा तालुक्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर व निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

फोंडे म्हणाले, महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे, हे खोटे आहे. दहा जिल्ह्यांतील आंदोलनाने त्यांचे खोटे उघडे पडले आहे. कोल्हापुरात दोन मंत्र्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतक-यांची बैठक घेऊन शेतक-यांचा संभ्रम दूर करावा. यावेळी शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, शामराव पाटील, सुरेश संकपाळ यांची भाषणे झाली.
महामार्ग रद्दच, चुकीचा प्रचार करणा-यांकडे दुर्लक्ष करा
भुदरगड मतदारसंघात काही एजंट हे महामार्ग पाहिजे असा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर जरब बसवा, अशी मागणी शेतक-यांनी पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे केली. यावर आबिटकर यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द केला आहे, त्यामुळे महामार्ग करा, असा चुकीचा प्रचार करणा-यांकडे दुर्लक्ष करा, असे शेतक-यांना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR