लातूर : प्रतिनिधी
जिल्हा कृषि महोत्सवात कृषि व गृहपयोगी वस्तू, कृषि तंत्रज्ञान, अवजारे, औषधे, बियाणांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. पहिल्याच दिवसी उद्घाटनाला मंत्री येणार म्हणून उशीर केला व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या कृषि महोत्सवावर टाकलेल्या बहिष्कारामुळे या कार्यक्रमाला ना मंत्री आले ना शेतक-यांचा, नागरीकांचा म्हणावा तसा सहभाग दिसून आला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लातूर जिल्हा कृषि महोत्सवास गुरूवार पासून सुरूवात झाली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता ठरले असताना दुपारी दोन वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे उद्घाटन न झाल्याने शेतकरी व नागरीकांची चलबिचल सुरू झाली. परिसरात मांडलेल्या स्टॉलमधील वस्तू पाहून नागरीक निघून जात असताना दुपारी सव्वा दोन वाजता उद्घाटन होत असताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेने सोयाबीन या शेतमालास भाव मिळत नाही म्हणून या लातूर जिल्हा कृषि महोत्सवाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरीकामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले. या बहिष्कारामुळे स्टॉल धारकत उलट सुलट चर्चा सुरू झाली.
नौटंकी महोत्सवावर शेतकरी संघटनेचा बहिष्कार
शेतकरी ते थेट ग्राहक या उद्देशाने कृषि महोत्सवा नियोजन करण्यात आल्याचा गाजावाजा केला. दुपारी उद्घाटन सुरू होण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे यांनी त्यांचे सहकारी व शेतक-यांना घेऊन कृषि महोत्सावावर बहिष्कार टाकला. मोरे म्हणाले की, शेतक-यांची व्यथा मांडण्यासाठी गळयात बॅनर घालून आलो. कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या पडत्या भावाच्या संदर्भाने बोलावे, विदेशातून आयात होत असलेल्या खाद्य तेलावर बोलावे. त्यांनी शेतकरी संघटनेची बाजू घेवून बोलावे. पटेल यांना पद मिळाल्यापासून हे सर्व कांही विसरले असल्याची घणाघाती टिका करत मोरे म्हणाले की, शेतक-यांचा उत्पादन खर्च चौपट होत असल्याने शेतक-यांचा मसनवाटा झाला असून सरकार याकडे पाहत नाही. हा नौटंकी महोत्सव असून त्यावर आमचा बहिष्कार आहे.
१० ते १५ स्टॉल रिकामेच
जिल्हा कृषि महोत्सवात कृषि व गृहपयोगी वस्तूंचे १७७ स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉल मध्ये कृषि तंत्रज्ञान, अवजारे, औषधे, बियाणे यासह महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी उत्पादित केलेल्या वस्तू स्टॉल असून उपस्थित नागरिकांनी या स्टॉलला भेट देवून वस्तूंची खरेदी केली. तसेच महिला बचतगटांचे खाद्य पदार्थांचे स्टॉलही याठिकाणी उभारण्यात आले आहेत. दुपारच्या गर्मीच्या वातावरणात एका-एका स्टॉल मध्ये दोन-दोन बचत गटांना बसवण्यात आले आहे. तसेच १७७ पैकी १० ते १५ स्टॉल रिकामेच दिसून आले. त्यामुळे या महोत्सावात दोन विरोधाभास दिसून आले.
नियोजनाचा अभाव
जिल्हा कृषि महोत्सवासाठी आलेल्या बचत गट, शेतकरी यांना ढिसाळ नियोजनाचा सामना करावा लागला. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेले बहूतांश पाण्याचे जार रिकामेच दिसून आले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकारी यांनी आपल्या स्टॉल धारकांना पाणी पिण्यासाठी मिळाले का ? अशी विचारणा केली असता पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याचे सांगीतले. कृषि महोत्सवात नियोजनाचा आभाव दिसून आला.