खनौरी : पंजाबमधील शेतक-यांनी ४ जानेवारीला महापंचायतीचे आयोजन केले आहे. पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी या ठिकाणी होणा-या महापंचायतीमध्ये इतर राज्यांमधील शेतकरीही सहभागी होणार आहेत. खनौरी भागात शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल महिनाभरापासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. तसे असूनही त्यांना रूग्णालयात हलवले जात नसल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी पंजाब सरकारला फटकारले.
डल्लेवाल यांना रूग्णालयात दाखल करण्यास विरोध करणारे शेतकरी त्यांचे हितचिंतक नसल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. त्या पार्श्वभूमीवर, शेतक-यांनी महापंचायतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डल्लेवाल यांनी व्हीडीओ संदेश जारी करून उपोषणावर ठाम असल्याची भूमिका मांडली. देशातील ७ लाख शेतक-यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या.
शेतक-यांचा जीव वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे मी उपोषण करत आहे. कुणाच्या दबावापोटी मी ते करत नाही. शेतक-यांच्या मागण्या मान्य करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे असे त्यांनी म्हटले. तशा विनंतीचे पत्र त्यांनी याआधीच न्यायालयाला पाठवले आहे. विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी १० महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलनाचा भाग म्हणून तळ ठोकून आहेत.