23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकरी आंदोलन डाव्यांनी हायजॅक केले : गुप्तचर अहवाल

शेतकरी आंदोलन डाव्यांनी हायजॅक केले : गुप्तचर अहवाल

आंदोलक शेतक-यांसाठी सहा महिन्यांचे राशन, गुरुद्वारा-आश्रमात राहण्याची सोय

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेले शेतक-यांचे आंदोलन हायजॅक करण्यात आले असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अल्ट्रा लेफ्ट आणि प्रो-लेफ्ट विंगने (डाव्या विचारधारेच्या दोन्ही आघाड्यांनी) हे आंदोलन हायजॅक केले असल्यामुळे सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या वाटाघाटी सतत फिसकटत आहेत. कदाचित, जाळपोळ, तोडफोड आणि हिंसक घडवून आणण्याचा कट या शेतकरी आंदोलनाच्या आडून रचण्यात आला असण्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

शेतकरी आज दिल्लीत दाखल होणार आहेत. शेतक-यांचा ‘दिल्ली मोर्चा’ रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी पाच तास चर्चा केली. पण, काही तोडगा निघालेला नाही. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार शेतक-यांनी आंदोलन २.०ची पूर्ण तयारी केली आहे.

गुप्तचर अहवालानुसार, एकट्या पंजाबमधून १५०० ट्रॅक्टर आणि ५०० वाहने घेऊन शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. यामध्ये सहा महिन्यांचे राशन, अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तू आहेत. त्यामुळे शेतक-यांनी दीर्घ आंदोलनाची तयारी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

शेतकरी प्रामुख्याने शंभू बॉर्डर (अंबाला), खानोरी (जिंद), दाबवली (सिरसा) या ठिकाणांहून दिल्लीत दाखल होतील. आंदोलनाच्या आधी किसान मजदूर संघर्ष कमिटीच्या नेत्यांनी केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि तामिळनाडूमध्ये जाऊन शेतक-यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यात राहता यावे अशी सोय करण्यात आली आहे.

अहवालामध्ये असेही म्हटले की, शेतकरी छोट्या-छोट्या गटाने दिल्लीमध्ये दाखल होतील. ते गुरुद्वारा, धर्मशाळा, आश्रम, गेस्ट हाऊसमध्ये थांबतील आणि आंदोलनात सहभागी होतील. मागील आंदोलनात शेतकरी अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून होते. तशीच तयारी शेतक-यांकडून आताही करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिल्लीची नाकेबंदी केली आहे. रस्ते अडवण्यात आले आहेत. मात्र, शेतक-यांनी दिल्लीत येण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR