22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रवाळूज येथे भीषण अपघात; ४ ठार

वाळूज येथे भीषण अपघात; ४ ठार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
लग्नानंतर दहा वर्षांनी घरात पाळणा हलला. बाळाचे बारसे करून कुटुंब आनंदात पुण्याला निघाले, पण वाटेतच विपरित घडले. मद्यपान करून गाडी चालवण्याच्या अक्षम्य चुकीमुळे चौघांना जीव गमवावा लागला. हा भीषण अपघात शुक्रवारी (१३) सायंकाळी ४ वाजता वाळूजजवळील पथकर नाक्याजवळ घडला.

दरम्यान, अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणारी भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येणा-या कारवर धडकल्याने गंभीर जखमी तीन महिला व एका ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अजय अंबादास बेसरकर (४०) हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या पुण्यात स्थायिक झाले आहेत. शुक्रवारी ते पत्नी मृणालिनी, ६ महिन्यांचा चिमुकला, सासू आशा पोपळघट (६५), मेहुणी शुभांगिनी सागर गिते (३५) व मेहुणीची मुलगी दुर्गा सागर गिते (७) यांच्यासह कारने (एमएच २७ बीझेड ००४५) संभाजीनगरमार्गे पुण्याला जात होते.

वाळूजजवळील शिवराई पथकर नाक्याजवळ सायंकाळी ४ वाजता अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव जाणा-या स्कार्पिओ जीपच्या (एमएच १२ केजे ४१३४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने जाणा-या बेदरकर यांच्या कारवर जाऊन धडकली. कारमधील चालक, दोन महिला व दोन लहान मुले गंभीर जखमी होऊन अडकून पडली. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत वाळूज पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

स्कॉर्पिओ चालकासह दोघे फरार
मृणालिनी, आशालता, दुर्गा सागर गिते व एका चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अजय, शुभांगिनी हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर जीपचा चालक व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी दोघांनाही केली अटक
दरम्यान, पोलिसांनी फरार झालेल्या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. विशाल ऊर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२, रा. बकवाल नगर वाळूज, ता. गंगापूर), कृष्णा कारभारी केरे (वय १९, बकवाल नगर, वाळूज) अशी आरोपींची नावे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR