नवी मुंबई : सायनमध्ये कॉलेजात शिकणा-या कळंबोलीतील १९ वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात नवी मुंबई पोलिसांना महिनाभरानंतर अखेर यश आले. या युवतीची हत्या करून तिच्या प्रियकराने जीवन संपवल्याचे स्पष्ट झाले आहे. या युवतीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेण्यात आली होती, हे विशेष.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी या प्रकरणाची बुधवारी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. कळंबोलीतील वैष्णवी बाबर ही १२ डिसेंबरला महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतलीच नव्हती, शोध घेताना मंगळवारी तिचा मृतदेह खारघरमध्ये निर्जनस्थळी सापडला होता.
वैष्णवी सायनच्या एसआयएस महाविद्यालयात शिकत होती. ती बेपत्ता झाली त्याच दिवशीपासून कळंबोलीतील वैभव बुरुंगल नावाचा तिचा प्रियकरही गायब असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. दरम्यानच्या काळात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांचे पथक वैष्णवीचा शोध घेत होते. खारघरच्या डोंगररांगांमध्ये वैष्णवी मृतावस्थेत सापडली.
पोलिस तपासात वैभवनेही १२ डिसेंबरलाच जुईनगर येथे लोकलखाली उडी घेत जीवन संपवल्याचे समोर आले. त्यापूर्वी वैभवने मोबाईलमध्ये खून करून जीवन संपवणार असल्याचे सांकेतिक भाषेत लिहून ठेवले होते. पोलिसांच्या पथकाने या सांकेतिक शब्दाचा उलगडा केला. वैष्णवी व वैभवचे तीन ते चार वर्षांपासून प्रेम होते. वैष्णवीच्या घरातून लग्नाला विरोध असल्याने वैष्णवीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता वैष्णवी आपल्याला भेटणार नसल्याचे समजताच वैभवने तिला अखेरच्या भेटीसाठी बोलावले. नंतर खारघर येथे नेऊन तिचा खून केला आणि त्यानंतर आपली जीवनयात्रा संपविल्याचे तपासात उघड झाल्याचे काळे यांनी सांगितले.