22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्रतलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधा

तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधा

- शिवसेना ठाकरे गट आक्रमक - रस्त्यावर उतरण्याचा इशारा

मुंबई : तलाठी भरती परीक्षा पुन्हा एका वादाच्या भोव-यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटीप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत ठाकरे गट रस्त्यावर उतरणार, असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.

कैलास पाटील म्हणाले, तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भव-यात होती. या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले ? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत हे चुकीचे असून सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा, ही आमची मागणी आहे.

तलाठी भरतीची सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून सरकारने भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची आता सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे कैलास पाटील म्हणाले.

जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत दोनशेहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय. तसेच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा आरोपही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

राधााकृष्ण विखे पाटलांनी आरोप फेटाळले
तलाठी भरती प्रक्रियेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना २०० पैकी २०० पेक्षा अधिक गुण मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरोपात कसलंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे, अधिका-यांना भरती संदर्भात अधिक माहिती घेण्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR