मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या मालाड परिसरात भीषण आगीची घटना समोर आली आहे. मालाडच्या खडकपाडा येथील फर्निचरच्या ४ ते ५ गोदामांना आग लागली आहे. सुरुवातीला एका फर्निचरच्या गोदामाला आग लागल्यानंतर अवघ्या काही क्षणांत ही आग इतरही गोदामांमध्ये पसरली आहे.
आसपास लोक राहत असलेल्या ठिकाणी अशाप्रकारे फर्निचरच्या गोदामांना आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला खडकपाडा परिसरातील एका गोदामाला आग लागली होती.
यानंतर काही कळायच्या आत ही आग आसपास असलेल्या चार ते पाच गोदामांपर्यंत पोहोचली. गोदामात लाकडी साहित्य असल्याने आगीचा मोठा भडका उडत असून आग पसरत जात आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीच्या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
तसेच नेमकी आग कशामुळे लागली, याचीही माहिती समोर आली नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे. लोकांची वर्दळ असलेल्या खडकपाडा परिसरात ही आग लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय ही आग इतरही दुकानांपर्यंत पोहोचू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.