मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या उमेदवार यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गोंधळ सुरू असल्याने मविआतील तीनही प्रमुख पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याआधीच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिली उमेदवार यादी जाहीर करत ६५ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यामध्ये पक्षाच्या विद्यमान आमदारांसह इतर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच अनपेक्षिरीत्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना ठाकरेंकडून मैदानात उतरवण्यात आले आहे.