नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. यामुळे नाशिकमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये शोभायात्रा काढली आहे. यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच आज सकाळी शांतिगिरी महाराजांनी भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिल्याचा मोठा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दाव्यावर महायुतीकडून काय प्रतिक्रिया येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतिगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीवेळी शांतिगिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआऊटला पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.