नागपूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत आहे. त्याचबरोबर निकाल काय लागणार आणि मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात राज्यात मुख्य लढत होत आहे. या दोन्ही आघाडींनी किंवा त्यांच्यातील कोणत्याही पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. पण, काँग्रेस नेत्यांच्या मुलींनी त्यांचे वडिल मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या पाठोपाठ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांच्या मुलीने देखील वडिलांसाठीच्या प्रचार सभेत तुफान फटकेबाजी केली.
विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वड्डेटीवार यांचे एक भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अकापूर गावात त्यांच्या भाषणा दरम्यान वीज गेली. त्यानंतर मोबाईलच्या उजेडात त्यांनी संपूर्ण भाषण पूर्ण केलं. या सर्व प्रकारानं शिवानी यांचा पारा चढला आणि त्यांनी महावितरणाच्या कर्मचा-यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
विजय वडेट्टीवार यांच्याप्रमाणेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कन्या प्रिया पटोले या देखील निवडणूक प्रचारात सक्रीय आहेत. नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात त्या वडिलांचा जोरदार प्रचार करत आहेत. ‘मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मतदान करा’, असे आवाहन प्रिया पटोले करत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार देखील लक्षवेधी ठरत आहे.
निवडणुकीच्या आखाड्यातील रणरागिणी
प्रिया नाना पटोले, शिवानी विजय वडेट्टीवार, अंकिता हर्षवर्धन पाटील, पूर्वा दिलीप वळसे पाटील, जयश्री बाळासाहेब थोरात, श्रीजया अशोक चव्हाण, प्रिया सदा सरवणकर