22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeक्रीडातीन महिन्यात दुस-यांदा कांगारूकडून स्वप्नभंग

तीन महिन्यात दुस-यांदा कांगारूकडून स्वप्नभंग

ऑस्ट्रेलियाने तीन महिन्यात भारतीय क्रीडा रसिकांचा दुस-यांदा स्वप्न भंग केला. द.आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ७९धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर १९वर्ल्डकप जिंकला. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये टीम इंडियाला विजयासाठी २५४ धावांचं आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे ४३.५षटकात १७४ धावांवर पॅकअप झाले.

भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन फक्त ८ धावा करून माघारी परतला. यामुळे कर्णधार उदय सहारनच्या नावावरती एका रेकॉर्डची नोंद झाली. कर्णधार उदय सहारनचा अंतिम सामन्यांमध्ये विशेष काही करू न शकलेल्या कर्णधारांच्या यादीत समावेश झाला. या पूर्वी यादीमध्ये भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा देखील समावेश आहे. याबरोबरच, अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत उन्मुक्त चंद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही.

अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली, मोहम्मद कैफ आणि पृथ्वी शॉ यांच्यासह सर्व कर्णधारांनी फायनलमध्ये लवकर विकेट गमावल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात उदय सहारनने १८चेंडूंत ८ धावा करून बाद झाला आहे. मोहम्मद कैफने २००० मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात १८धावा केल्या. तर २००६मध्ये लंकेत झालेल्या अंतिम सामन्यात कर्णधार रविकांत शुक्ला केवळ १ धाव करून बाद झाला होता. या स्पर्धेत रोहित शर्मा रवींद्र जडेजा पियुष चावला ही सहभागी होते. तसेच २००८मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहली देखील फक्त १९ धावा करून बाद झाला.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन महिन्यात हा दुसरा पराभव आहे. याआधी २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत १९ नोव्हेंबरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वरिष्ठ संघाने प्रथम फलंदाजी करताना २४०धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला होता.

मैदानाबाहेरून,
डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR