सोलापूर : महेशअण्णांचे जाणे म्हणजे ‘माझा आनंद हरपला’ अशीच उणीव झाली आहे. विडी घरकुलसारखे दुसरे प्रतीसोलापूर निर्माण करणारे हे नेते होते, असे विचार व शब्द सुमनांजली उपस्थितांनी मांडली. माजी महापौर स्व. महेश कोठे यांच्या निधनानिमित्त विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत शोकसभेमध्ये शब्दसुमनांजली व्यक्त केल्या.
सांगून नगरसेवक बनवतो असे ब्रीद असणारे महेश कोठे होते. घरकुल तसेच पूर्व भागांमध्ये अनेक विकासकामे त्यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक निधी याच भागांना मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे. माणुसकी असणारा खरा जनसेवक होते. ज्या पक्षात प्रवेश करतील त्या पक्षाचे तिकीट त्यांना मिळायचे. सोलापूर शहरामध्ये आयटी पार्क व्हावा, हीच इच्छा होती की आता सोलापूरकरांनी पूर्ण करावी. महेशअण्णांचे जाणे आणि शहर कासावीस होणे ही दुर्मिळ घटना आहे. जिल्हाधिका-यांचे आमदार झालेले प्रमाणपत्र मिळालेले नसले तरी ते ख-या अर्थाने जनतेचे आमदार होते, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी मांडल्या.
शोकसभेमध्ये महेश कोठे यांचे पुतणे आमदार देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक व चिरंजीव प्रथमेश कोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे, शिवसेनेचे अमोल शिंदे, सुधीर बहिरवाडे, भाजपचे शहाजी पवार, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी केदार उंबरजे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, अक्षय वाकसे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, कम्युनिस्ट पक्षाचे युसूफ मेजर,सुरेश पाटील, नागेश वल्याळ, माजी महापौर मनोहर सपाटे, सुधीर खरटमल, माजी महापौर श्रीकांचना यन्त्रम, अंबादास गुत्तीकोंडा, शिवरत्न शेटे, माजी नगरसेवक रियाझ मोमीन, आनंद चंदनशिवे, अजय दासरी, यु. एन. बेरिया, महेश गादेकर, सिद्धाराम चाकोते यांच्यासह स्व. महेश कोठे यांच्यावर प्रेम करणा-या कार्यकर्ते, त्यांच्या विविध शिक्षण संस्थांतील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केले. संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात आयोजित शोकसभेमध्ये स्व. महेश कोठे यांच्या जीवनपटावर आधारित चलचित्रफीत दर्शविण्यात आली. जी पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या चित्रपट मध्ये त्यांचा राजकीय, सामाजिक आणि लोकसेवेचा सहभाग दर्शविण्यात आला होता.