नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे माजी पंतप्रधान, जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि देशाच्या राजकारणातील एक विनम्र, सुसंस्कृत, संवेदनशील मनाचे नेते अशी ओळख असलेले नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. आज दिल्लीच्या निगमबोध घाट येथे डॉ. मनमोहन सिंग यांचा अन्त्यविधी पार पडला. देशभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात मनमोहन सिंग यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली असून सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री मनमोहन सिंग यांचे निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील बड्या नेत्यांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज सकाळी मनमोहन सिंग यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. याठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर काँग्रेस मुख्यालय ते निगमबोध घाटपर्यंत त्यांची अन्त्ययात्रा काढण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांच्यासह भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि अन्य पक्षांमधील अनेक दिग्गज नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. अन्त्यसंस्कारापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात आले तसेच २१ तोफांची सलामी देत त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
‘भारतरत्न’ देण्याची मागणी..
दरम्यान, यावेळी उपस्थितांनी डॉ. मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ द्यावा, अशी मागणी केली. ‘मनमोहन सिंग अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. लाडक्या नेत्याला, एका शांत, संयमी अन् जगविख्यात गणितज्ज्ञाला निरोप देताना सर्वच जण भावूक झाले होते.