27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रगणपतीपुळे समुद्रात चौघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

गणपतीपुळे समुद्रात चौघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

गणपतीपुळे : प्रतिनिधी
देवदर्शनासाठी आलेले पंढरपूर येथील चौघे अंघोळ करताना खोल समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सकाळी गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र, अन्य तिघांना वाचविण्यात यश आले. अजय बबन शिंदे (२३), आकाश प्रकाश पाटील (२५) आणि सार्थ दत्तात्रय माने (२४, सर्व रा. इसबावे, पंढरपूर) अशी दुर्घटनेतून वाचलेल्या तिघांची नावे आहेत.

अजित वाडेकर आणि त्यांचे मित्र रविवारी सकाळी १० वाजता दुचाकींवरून पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. देवदर्शन न करता आधी समुद्रात स्रान करण्याचा निर्णय चौघांनी घेतला. स्रान करताना खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी अजित वाडेकर खोल पाण्यात अडकले.

त्यांना बाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरड केली. ही गोष्ट जीवरक्षक आणि गस्तीसाठी असलेले गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेडकॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जीवरक्षकांना बोलावून समुद्राच्या पाण्यात पाठवले.

जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, विशाल निंबरे यांच्यासह व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी तपासून अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेले अजित धनावडे यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. मित्रांसोबत देवदर्शनाला ते आले असता काळाने त्यांना हिरावून घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR