31 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्र५ जानेवारीपासून अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलन

५ जानेवारीपासून अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलन

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्य संमेलन येत्या दि. ५ ते ७ जानेवारी दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात होत असून तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उद्घाटन सोहळा पुण्यात तर अन्य कार्यक्रम पिंपरी-चिंचवड भागात होणार आहेत.

नाट्य संमेलनाच्या निमित्ताने भव्य यात्रा आणि दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने बहुरूपी भारूड हा कार्यक्रम होणार आहे. दुपारच्या सत्रात ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन, त्यानंतर ‘पारंपरिक लावणी ’ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संगीत नाट्य परंपरेचा अनोखा आविष्कार ‘नाट्य धारा’ हा कार्यक्रम होणार आहे.

नाट्य संमेलन उद्घाटन सोहळा सायंकाळी होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, तसेच नाट्य संमेलन अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अखिल भारतीय नाट्य संमेलन अध्यक्ष प्रशांत दामले तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर आर्या आंबेकर आणि राहुल देशपांडे यांचा नाट्य संगीताचा कार्यक्रम आणि समारोप मराठी गाण्यांची संगीत रजनी कार्यक्रमाने होणार आहे, अशी माहिती परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितली.

नाट्य महोत्सव सलग सहा महिने राज्यातील विविध जिल्ह्यांत होणार असून त्यानिमित्त नाट्य प्रयोग, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाचा समारोप रत्नागिरी येथे होणार आहे असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड भागातील विविध कार्यक्रमांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR