31.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रप्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात गडचिरोली आणि गोंदिया राज्यात अव्वल

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात गडचिरोली आणि गोंदिया राज्यात अव्वल

गडचिरोली : देशात दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी विविध सुरक्षा दलांच्या जवानांच्या पथसंचलनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात देखील पोलिस दलातील विविध घटकांतील पथके आपल्या शिस्तीचे, एकजुटीचे प्रदर्शन पथसंचलनाच्या माध्यमातून दाखवितात. अशातच गेल्या २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत, मुंबई येथे झालेल्या पथसंचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

त्याकरिता गठित करण्यात आलेल्या निवड समितीने उत्कृष्ट पथसंचलनासाठी प्रथम क्रमांकासाठी गडचिरोली आणि गोंदिया पोलिसांच्या सी-६० पथकाची निवड केली आहे. तर द्वितीय क्रमांक राज्य राखीव पोलिस बल आणि तृतीय क्रमांक बृहन्मुंबई पोलिस दंगल नियंत्रण पथक, अशा तीन पथकांची यात निवड करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिस दल आणि गोंदिया पोलिस दलाच्या सी ६० पथकाने संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट पथसंचलन करुन २६ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक पटकविला. या कार्यक्रमाला प्रमुख्याने महामहिम राज्यपाल यांची उपस्थिती लाभली होती. त्यावेळी राज्यभरातून आलेल्या विविध पथसंचलनापैकी गडचिरोली पोलीस दल आणि गोंदिया पोलिस दलाच्या सी – ६० पथकाची निवड करण्यात आल्याने, गडचिरोली-गोंदिया पोलिसांमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गडचिरोली, गोंदिया पोलिस दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

प्रजासत्ताक दिनी पथसंचलनामध्ये सर्वोत्कृष्ट पथसंचलन करणा­-या पथकांना आज दिनांक २९ एप्रिल रोजी राज्याचे अप्पर पोलिस महासंचालकांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. गडचिरोली पोलिस दलाचे सी – ६० पथके माओवादविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असतात, त्यासोबतच पथसंचलनामध्ये देखील त्यांनी आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांची ही कामगिरी सा-यांच्या कौतुक आणि अभिनंदनाचा विषय ठरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR