सोलापूर : मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कटू कारवाईला सुरुवात केली आहे. याअंतर्गत बड्या थकबाकीदारांची नावे चक्क गड्डा यात्रा होम मैदान परिसरात डिजिटल बोर्डावर प्रदर्शित केली आहे.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची (गड्डा) यात्रा सध्या होम मैदान परिसरात सुरू आहे. दररोज हजारो लोक या यात्रेत सहभागी होतात. या लोकांना येथील होम मैदानात मिळकतकर थकीत ठेवणा-या बड्या थकबाकीदारांची नावे डिजिटलवर दिसत आहेत. या डिजिटल फलकामुळे थकबाकीदारांची मोठ्या प्रमाणात जग जाहीर करण्यात आली आहेत. मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासन अशा पद्धतीने विविध माध्यमांचा उपयोग करत आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील विविध पेठांमध्ये मिळकतकर थकबाकीदारांच्या नावाची यादी असलेले डिजिटल फलक लावण्याचे नियोजन केले आहे. शहरातील विविध ठिकाणी हे फलक लावण्यास सुरुवात झाली, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
शहरात मिळकतकर थकबाकी वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू आहे. थकबाकीपोटी नळ कनेक्शन तोडणे, गाळे सील करणे यासह अन्य कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर आता बड्या थकबाकीदारांकडून प्रभावीपणे कर वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा थकबाकीदारांची नावे डिजिटल लावण्यात येत आहे. गड्डा यात्रा परिसरात सुमारे सहा ठिकाणी हे डिजिटल लावण्यात आले आहेत.
सोलापूर शहरातील विविध ५४ पेठांमध्ये असे डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. प्रत्येक पेठेत दोन मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल द्वारे थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक फलकावर २० थकबाकीदारांची यादी राहणार आहे. शहरातील मिळकतदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी मिळकतकराची थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावे अन्यथा महापालिका प्रशासनाकडून नळ कनेक्शन तोडण्याबरोबरच, बड्या थकबाकीदारांची नावे डिजिटल लावणे व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे.