नागपूर : विशेष प्रतिनिधी
जातिपातीचं राजकारणं हे भारताच्या राजकीय क्षेत्रातील कटू वास्तव आहे. अनेक बडे नेते आणि सर्वच राजकीय पक्ष निवडणुका ज्ािंकण्यासाठी कुठे ना कुठे जातिपातीच्या राजकारणाचा आधार घेत असतात. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली.
महाराष्ट्रामध्ये सध्या जातिपातीचं राजकारण होत आहे. मी जात-पात मानत नाही. जो जातिपातीची बात करेल, त्याच्यावर मी सणसणीत लाथ मारेन, असा इशाराच नितीन गडकरी यांनी दिला.
गडकरी पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात ४० टक्के मुसलमान आहेत. मी त्यांना आधीच सांगितलं की, मी आरएसएसचा माणूस आहे. कुणालाही मत देण्यापूर्वी नंतर आपल्याला पुढे पश्चाताप होणार नाही याचा विचार केला पाहिजे. जो मला मतदान करेल त्याचं मी काम करणार आणि जो मत देणार नाही त्याचंही काम करणार, असे गडकरी यांनी सांगितले.
राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार असून, विधानसभेच्या २८८ जागांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण अनेक उलथापालथींमुळे गाजत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता कसा कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.