बंगळूरू : इस्रोने चांद्रयान-३ मिशनच्या मोठ्या यशानंतर आता गगनयान मोहिमेवर वेगाने काम सुरू केले आहे. गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. म्हणजेच, या मोहिमेद्वारे मानवाला अंतराळात पाठवले जाणार आहे. या मोहिमेसाठी इस्रोने एक मोठी कामगिरी केली आहे.
या मोहिमेबाबत माहिती देताना इस्रोने सांगितले की, गगनयान मोहिमेसाठी लागणारे सीई२० क्रायोजेनिक इंजिन तयार झाले आहे. अनेक चाचण्यांनंतर सीई २० क्रायोजेनिक इंजिनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले असून हा गगनयान मोहिमेतील महत्वाचा टप्पा आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे फोटोही शेअर केले आहेत. इस्रोने सांगितल्याप्रमाणे, गगनयान मोहिमेसाठी सीई २० क्रायोजेनिक इंजिन सज्ज आहे. सीई २० इंजिनच्या ग्राउंड पात्रता चाचण्यांची अंतिम फेरी १३ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. या अंतर्गत या क्रायोजेनिक इंजिनची मानवी रेटिंग प्रक्रिया यशस्वी मानण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंजिन कसे आहे, ते पूर्णपणे तयार आहे की नाही? याबाबत सर्व चाचण्या झाल्या आहेत. आता हे इंजिन एलव्हीएम ३ लॉन्च व्हेइकलला उर्जा देईल.
काय आहे गगनयान मिशन ?
गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो मानवाला अंतराळात पाठवण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेअंतर्गत तीन लोकांची टीम अंतराळात पाठवली जाईल आणि त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले जाईल. इस्रोची गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास, असे करणारा भारत अमेरिका, चीन आणि सोव्हिएत संघानंतरचा चौथा देश बनेल.